MPSC चा अभ्यास करताना ‘या’ गोष्टींकडे जास्त लक्ष द्या;

Important Tips While Studying For MPSC Exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission -MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. याच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलिस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी इत्यादी वर्ग-१ व वर्ग-२ ची पदे भरली जातात.

‘या’ पद्धतीने करा अभ्यास

  • अधिकारी हा समाजाच्या द़ृष्टीने विचार करणारा, तसेच सामाजिक बांधिलकी जपून कल्याणकारी निर्णय घेणारा असावा. यासाठी प्रत्येक उमेदवाराने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील घडामोडी यांचा अभ्यास करणे अपेक्षित असते.
  • चालू घडामोडींचा अभ्यास हा कमी वेळेत व परीक्षाभिमुख करावा लागतो. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे एक वेगळा द़ृष्टिकोन बाळगावा लागतो.
  • चालू घडामोडींचा अभ्यास करताना सर्वच घडामोडींना सारखेच महत्त्व देणे उचित ठरत नाही. त्यासाठी परीक्षेच्या अभ्यासाला केंद्रबिंदू मानावे तसेच यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे निदर्शनास येते की, प्रश्नांचे दोन प्रकारात वर्गीकरण होते.
  1. अ) सामान्य अध्ययन विषयासंदर्भातील प्रश्न.
  2. ब) केवळ चालू घडामोडी संदर्भातील प्रश्न.

म्हणजेच, वर्तमानपत्राचे वाचन करताना सामान्य अध्ययन विषयांच्या मुद्द्यांशी सांगड करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे याचा फायदा मुख्य परीक्षेमधील निबंध लेखन व शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत यासाठी होतो. नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम प्रत्येक विषयांमधील मूलभूत संकल्पना समजावून घ्याव्यात. त्यानंतरच वर्तमानपत्र किंवा इतर स्रोतामधून चालू घडामोडींचा अभ्यास करावा. यामुळे उमेदवाराचा वेळ वाचतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुद्दा/संकल्पना योग्यरीत्या समजण्यास मदत होते व चालू घडामोडींकडे बघण्याचा स्पर्धात्मक द़ृष्टिकोन प्राप्त होतो. चालू घडामोडी या सर्वसाधारणपणे राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरूपाच्या असतात. याचा परिणाम मुख्य परीक्षांच्या विषयांवर पडतो.

महत्त्वाचे : कायदे, विधेयक, घटनादुरुस्त्या, महत्त्वाच्या परिषदा, संस्था, नवीन शोध, समित्या आयोग त्यांचे अहवाल, महत्त्वाची कलमे, आर्थिक घटना व आकडेवारी, न्यायालयीन निवाडे नवीन योजना अंमलबजावणी इत्यादी. याव्यतिरिक्त फक्त चालू घडामोडी संबंधित चर्चेतील व्यक्ती, नियुक्त्या, निधन वार्ता, ग्रंथ त्यांचे लेखक, पुरस्कार, क्रीडा इ. आणि अशाच प्रकारचे वर्गीकरण होय. यासाठी उमदेवारांनी दररोजच्या वर्तमानपत्राचे वाचन, महिन्यांची मासिके वापरावीत तसेच आठवड्याच्या दर रविवारच्या वर्तमानपत्रांमधील पुरवण्या वाचाव्यात. यामध्ये आठवडाभर घडलेल्या घटनांचा सविस्तर लेखाजोखा असतो. अशाप्रकारे अभ्यास केल्यास अभ्यासाला योग्य न्याय मिळून परीक्षेमध्ये योग्य गुण प्राप्त होतात.

क्रेडीट: esakal

Leave a Comment